गेल्या काही महिन्यांत शहरात सुरू असलेल्या स्वाइन फ्लूच्या साथीमुळे सार्वजनिक व्यवहारांवर बंधने आली होती. ज्या काळात महोत्सवाच्या आयोजनाची तयारी सुरू होत असते नेमक्या त्याच कालखंडात या साथीचा संसर्ग वाढला होता. त्यामुळे मंडळाच्या विश्वस्तांनी महापालिका आयुक्त महेश झगडे आणि पोलिस आयुक्त डॉ. सत्यपालसिंह यांच्याशी चर्चा केली. डिसेंबरमध्ये थंडीचे प्रमाण वाढते आणि त्याच काळात स्वाइन फ्लूच्या विषाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना व्यक्त केला होता. त्यामुळे दर वर्षी डिसेंबरमध्ये दुसऱ्या आठवड्यात गुरुवार ते रविवार असे चार दिवस पाच सत्रांत होणारा महोत्सव स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.
आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त केलेल्या या महोत्सवासाठी देशभरातून; त्याचप्रमाणे परदेशांतूनही रसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. त्यामुळे दर वर्षी डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणारा हा महोत्सव शक्य तेवढ्या लवकर नेहमीच्या पद्धतीने साजरा करण्याच्या दृष्टीने पावले उचलली. आता जानेवारीमध्ये दुसऱ्या आठवड्यातील गुरुवार ते रविवार या कालावधीत तो घेण्याचे निश्चित केले आहे, असे मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी आणि कार्यकारी सचिव पं. श्रीकांत देशपांडे यांनी सोमवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे.