काही दिवसांपूर्वी श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागल्यानं जगदीश खेबुडकर यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. सुरुवातीचे काही दिवस ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत होते. परंतु, नंतर त्यांची तब्येत अचानक खालावली गेली आणि किडनी निकामी झाल्यानं आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यानं मराठी सिनेजगतात शोककळा पसरली आहे.
जगदीश खेबुडकर यांचा जन्म १० मे १९३२ सालचा. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहिली आणि इथेच त्यांचं कार्यक्षेत्र ठरून गेलं. १९५६ रोजी त्यांचेपहिले गीत आकाशवाणीवर प्रसारित झालं, तर १९६० रोजी त्यांचं पहिले चित्रगीत प्रेक्षकांसमोर आलं. त्यानंतर या प्रतिभासंपन्न कवीनं मागे वळून पाहिलं नाही. उत्कट भावभावनांचा सौंदर्यपूर्ण आविष्कार त्यांच्या लेखणीतून साकारत गेला आणि त्यांनी मराठी गीत-संगीतप्रेमींना मोहून टाकलं. आकाशी झेप घे रे पाखरा, पिकल्या पानांचा देठ की हो हिरवा, मला हो म्हणतात लवंगी मिरची, विठुमाऊली तू माऊली जगाची, ऐरणीच्या देवा तुला, कसं काय पाटील बरं हाय का, अष्टविनायका तुझा महिमा कसा, तुम्हावर केली मी मर्जी बहाल यासारखी बहुरंगी, बहुढंगी गाणी त्यांनी लिहिली आणि मराठी रसिकांना अक्षरशः वेड लावलं. पिंजरा चित्रपटातल्या प्रत्येक लावणीतला प्रत्येक शब्द त्यांनी ज्या ताकदीनं लिहिला त्याला तोड नव्हती.
आपल्या ५०-५२ वर्षांच्या कारकीर्दीत साडेतीन हजार कविता , पावणेतीन हजारचित्रगीते , २५ पटकथा , संवाद , ५० लघुकथा , पाच नाटके , चार दूरदर्शन मालिका, चार टेलिफिल्म , पाच मालिका गीते जगदीश खेबुडकरांच्या नावावर जमा आहेत. जुन्या काळातील अनेक मातब्बर गायक-संगीतकारांसोबत त्यांनी जितक्या सहजतेनं काम केलं, तितक्याच सोपेपणानं त्यांनी नव्या पिढीतल्या गायक-संगीतकारांशीही जुळवून घेतलं. अलिकडच्या काळात अजय-अतुलनं संगीतबद्ध केलेलं मोरया-मोरया हे गाणंही खेबुडकरांचंच आहे. किंबहुना, अजय-अतुलच्या संगीतावर खेबुडकरांनी या गाण्याचे शब्द लिहिले आहेत. यातून त्यांचं सामर्थ्य सहज लक्षात येतं.
सिनेसंगीतविश्वाला दिलेल्या योगदानाबद्दल जगदीश खेबुडकर यांना व्ही. शांताराम स्मृती जीवनगौरव पुरस्कार, ‘ मृत्युंजय ’ कार शिवाजी सावंत पुरस्कार, बालगंधर्व स्मारक समिताचा बालगंधर्व पुरस्कार यासारखे अनेक सन्मान मिळाले होते.
मी साहित्यिक झालो, जन्माचं सार्थक झालं, अशा भावना ठाण्याच्या साहित्य संमेलनात व्यक्त करणा-या जगदीश खेबुडकरांनी आज ईहलोकीचा निरोप घेतला. ते आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांची गाणी आपल्या ओठांवर कायमच येतील, आकाशवाणीवर त्यांचं गाणं वाजलं नाही, असा एकही दिवस जाणार नाही, अशा भावना व्यक्त करत सिने-साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Tuesday, May 3, 2011
ज्येष्ठ कवी व गीतकार जगदीश खेबुडकर यांचे निधन
देवघरात म्हणायची भक्तीरसपूर्ण गाणी असोत, किंवा ठसकेबाज लावणी... आपल्या नवनवोन्मेषी प्रतिभेच्या जोरावर ही दोन्ही परस्परविरोधी गीतं एकाचवेळी समर्थपणे लिहिणारे, मराठी चित्रपटांना अनेक अजरामर गीतांची देणगी देणारे ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर यांचं आज निधन झालं. कोल्हापुरातल्या आधार हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. ते ८० वर्षांचे होते.
Subscribe to:
Posts (Atom)