बुजुर्ग कलावंतांचे अनुभवसिद्ध "जाणते सूर' आणि उदयोन्मुख पण गुणवान कलाकारांचे "ताजे सूर' यांचा मिलाफ असणारा "सवाई गंधर्व संगीत महोत्सव' रमणबाग प्रशालेच्या प्रांगणात 9 ते 12 डिसेंबरदरम्यान रंगणार आहे. महोत्सवाचे हे 58 वे वर्ष असून 25 हून अधिक कलाकारांचा कलाविष्कार रसिकांना अनुभवता येणार आहे.आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या या संगीत महोत्सवाची उत्सुकता जगभरातील रसिकांना असते. ज्या सवाई गंधर्व यांच्या स्मृतीनिमित्त हा संगीत सोहळा आयोजित केला जातो, ते किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि गुरू पंडित सवाई गंधर्व ऊर्फ राजाभाऊ कुंदगोळकर यांचे हे 125 वे जयंती वर्ष आहे, अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
""चार दिवसांच्या या महोत्सवात एकूण पाच संगीतसत्रे होणार आहेत. नऊ डिसेंबरला युवा सनईवादक भास्कर नाथ यांच्या वादनाने 58 व्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवाची सुरवात होईल. या वर्षी "सवाई'च्या स्वरमंचावर नाथ यांच्यासह पुणेकर कलाकार समीर दुबळे, सावनी शेंडे साठ्ये, सुधाकर चव्हाण (गायन), शकीर खान (सतार); तसेच चंद्रकांत लिमये, उमा गर्ग, भुवनेश कोमकली आदींचे प्रथम पदार्पण होणार आहे. काही वैशिष्ट्यपूर्ण जुगलबंदीचे कार्यक्रमही होणार असून त्यात देबप्रिया अधिकारी आणि समन्वय सरकार (सतार आणि गायन), पं. विश्वमोहन भट आणि यू. श्रीनिवास (मोहनवीणा आणि मेंडोलीन) यांचे आविष्कार रसिकांसमोर येतील. ज्येष्ठ नर्तक पं. बिरजू महाराज यांचे पुत्र आणि शिष्य दीपक आणि ममता महाराज यांच्या कथकची अदाकारी रसिक अनुभवतील. बुजुर्ग कलाकारांमध्ये पं. जसराज, पं. हरिप्रसाद चौरासिया, पं. शिवकुमार शर्मा, पं. राजन व पं. साजन मिश्रा, मालिनी राजूरकर, डॉ. प्रभा अत्रे, पद्मा तळवलकर यांच्या मैफलींचा आनंद रसिकांना मिळेल. याशिवाय मीना फातरफेकर, उपेंद्र भट, आनंद भाटे, शरद खळदकर हे कलाकारही आपली कला सादर करणार आहेत. बेगम परवीन सुलताना यांचेही गायन रसिकांच्या आकर्षणाचे केंद्र असेल,'' असे श्रीनिवास जोशी म्हणाले."
सवाई'ची तिकीटविक्री- एक डिसेंबरपासून तिकिटे उपलब्ध होणार- दिनशॉ अँड कंपनी, बेहेरे आंबेवाले (बाजीराव रस्ता), शिरीष ट्रेडर्स (कमला नेहरू पार्कसमोर) आणि नावडीकर म्युझिकल्स (स. प. महाविद्यालयासमोर आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोर)- भारतीय बैठक सीझन तिकीट 350 रुपये, खुर्ची 1800 रुपये- एका दिवसाचे भारतीय बैठकीचे तिकीट 100 रुपये- रविवारचे तिकीट भारतीय बैठक 200 रुपये- विद्यार्थ्यांसाठी ओळखपत्र दाखवून भारतीय बैठकीचे सीझन तिकीट 150 रुपये.
भीमसेन जोशी यांच्या गानसेवेबाबत उत्सुकता: सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे अध्वर्यू पं. भीमसेन जोशी या वर्षी गानसेवा रुजू करणार का, या प्रश्नावर श्रीनिवास जोशी म्हणाले, "प्रकृतिअस्वास्थ्यामुळे शक्यता कमी आहे; पण त्यांनी इच्छा दर्शवली तर ते गाऊ शकतील. नक्की सांगणे अवघड आहे.''
दर वर्षीप्रमाणे रात्री बारा वाजेपर्यंत महोत्सवास परवानगी मिळावी, असा अर्ज संबंधितांकडे केला असून तशी परवानगी मिळेल, असेही ते म्हणाले. गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मृत्यर्थच हा महोत्सव होत असल्याने 125 व्या जयंतीचे औचित्य साधून पुण्याबाहेरही सवाई गंधर्व संगीत उत्सवाचा उपक्रम सुरू केल्याचे ते म्हणाले. मुंबई आणि नाशिक येथे असे उत्सव केले असून आता नागपूर येथे करण्याचा विचार आहे, असे त्यांनी सांगितले.