ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका वीणा सहस्त्रबुद्धे यांच्या षष्ठी निमित्त त्यांचा शिष्यपरिवार तर्फे २५ फेब्रुवारी ला विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
- वीणाताइंचा सत्कार - हस्ते दाजिकाका गाडगीळ आणि पं. शरद साठे
- गायन : श्री विजय सरदेशमुख - साथ: डॉ. अरविंद थत्ते (संवादिनी), संजय देशपांडे (तबला)
- तबला एकलवादन - पं. सुरेश तळवलकर - साथ - सत्यजित तळवलकर, तन्मय देवचके, आदित्य
खांडवे, सावनी तळवलकर, ओंकार दळवी
स्थळ: यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड
२५ फेब्रुवारी , सायंकाळी ६:००
गायन, वादन आणि नृत्याचा अनोखा मिलाफ असलेल्या "स्वर तालयात्रा' या कलाविष्काराने रसिक शुक्रवारी मंत्रमुग्ध झाले. सहवादन आणि जुगलबंदीच्या माध्यमातून स्वर, ताल, लय आणि नादाची अनुभूती देणाऱ्या कार्यक्रमाने "पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सवा'स सुरवात झाली.
तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान, आपला परिसर ट्रस्ट आणि नगरसेवक उज्ज्वल केसकर यांच्यातर्फे आयोजित "पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सवा'चे उद्घाटन ज्येष्ठ तबलावादक तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते झाले. विद्याताई अभिषेकी, आमदार गिरीश बापट, नगरसेवक अनिल शिरोळे, भरत वैरागे, गणेश बिडकर, मनीष साळुंके आणि योगेश गोगावले या वेळी उपस्थित होते. 'सकाळ' या महोत्सवाचा माध्यम प्रायोजक आहे.
पं. तळवलकर यांनी या कार्यक्रमामागची संकल्पना सांगितली. ते म्हणाले, "गायन, वादन आणि नृत्य यातून केवळ संगीताचा आविष्कार होतो. पंरपरेमध्ये नवतेची मूल्ये सामावली आहेत आणि नवतेला परंपरेचा साज असतो.'' या कार्यक्रमात त्यांच्यासह सत्यजित तळवलकर, चारुदत्त फडके (तबला), ओंकार दळवी (पखवाज), श्रीधर पार्थसारथी (मृदंग), तन्मय देवचक्के (हार्मोनिअम), रवी चारी (सतार), अनय गाडगीळ (सिंथेसायझर), संदीप कुलकर्णी (बासरी) यांचा सहभाग होता. शौनक अभिषेकी आणि रघुनंदन पणशीकर यांच्या गायन साथीने कार्यक्रमात रंग भरला. शांभवी वझे, परिमल फडके, कावेरी आगाशे, मुक्ती श्री आणि शीतल कोलवालकर यांनी नृत्याचे सादरीकरण केले. इशान कौशल, सावनी तळवलकर आणि मयंक बेडेकर यांनी पढंत गायनाची साथ केली.
'महादेव शंकर' या शिववंदना बंदिशीने कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर राग 'सोहनी'ची "चलो हटो पियॉं' ही आडा चौतालाची रचना सादर करण्यात आली. स्वर, ताल आणि भरतनाट्यम-कथक नृत्य यांच्या जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध झाले. राधा-कृष्ण स्तुतीपर रचना आणि "ललत' रागातील तराणा सादर झाला. उत्तरार्धात तळवलकर यांनी विविध मात्रांचे लालित्यपूर्ण सादरीकरण केले. ज्येष्ठ नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.