जयपूर-अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका धोंडूताई कुलकर्णी (८६) यांचे रविवारी मुंबईत निधन झाले. किडनीचा आजार बळावल्याने त्यांना जोगेश्वरी येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने शास्त्रीय संगीतातील एक पर्व संपले अशी भावना संगीत क्षेत्रातील मान्यवरांकडून व्यक्त होत आहे.
संगीत आराधना हेच ध्येय
कोल्हापूरमध्ये सन १९२७ मध्ये जन्मलेल्या धोंडूताई कुलकर्णी यांना गोड गळ्याची निसर्गदत्त देणगी लाभली होती. वयाच्या आठव्या वर्षी त्या 'आकाशवाणी'वर पहिल्यांदा गायल्या होत्या, पण त्यांना शास्त्रीय संगीताचे वेड त्याहीआधी म्हणजे वयाच्या पाचव्या वर्षांपासूनच लागले होते. संगीत आराधना हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते.
वयाच्या दहाव्या वर्षांपासून त्यांनी खऱ्या अर्थाने आपले संगीतशिक्षण सुरू केले. पुढे दहा वर्षे त्यांनी भुर्जी खाँसाहेब यांच्याकडे जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रशुद्ध गायकीचे धडे घेतले. लक्ष्मीबाई जाधव आणि नंतर सुरश्री केसरबाई केरकर यांच्याकडेही संगीत आराधना करून त्यांनी जयपूर घराण्याची शास्त्रशुद्ध गायकी आत्मसात केली. केसरबाईंचे शिष्यत्व स्वीकारलेल्या धोंडूताईंनी १९६२ ते ७१ या काळात त्यांच्याकडून संगीताचे धडे घेतले.
संगीत आराधना हेच आपल्या जीवनाचे ध्येय असल्याची प्रतिज्ञा धोंडूताईंनी केली होती आणि त्यासाठी त्यांनी विवाह केला नाही. त्यांनी कधीही गाण्याचा बाजार मांडला नाही की ग्लॅमर आणि प्रसिद्धीचा मोह धरला नाही. आकाशवाणीसह त्यांनी देशाच्या अनेक शहरात संगीताच्या मैफिली केल्या. या वयातही त्या संगीताचा रियाज नियमितपणे करीत. ज्ञानाची प्रक्रिया अखंडपणे सुरूच असते, त्याला कधी पूर्ण विराम देता येत नाही असे धोंडूताई सांगत.
जयपूर-अत्रौली घराण्याची वैशिष्ट्ये असलेल्या ख्याल, भजन, गायकीच्या बंदिशी सादर करणे यात त्यांचा हातखंडा होता. गाण्यावर असलेली अढळ निष्ठा, प्रेम, अपार मेहनतीमुळे प्रवाहाविरोधात जाऊन त्यांनी स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले होते. राज्य सरकारचा जीवन गौरव पुरस्कार, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, यावर्षीचा चतुरंग संगीत सन्मान आदी अनेक मानाच्या पुरस्कारांवर धोंडूताईंनी आपले नाव कोरले होते. गायक आदित्य खानवे आणि ऋतुजा लाड आदी शिष्य त्यांची गायकीची परंपरा पुढे चालवत आहेत.
'आदर्श घालून देणारं व्यक्तिमत्त्व' धोंडूताईंच्या गाण्यात लक्ष्मीबाई जाधव यांच्या गाण्याच्या स्पष्ट खुणा दिसत. तरी त्यांनी केसरबाई, भुर्जी खाँसाहेब यांच्याकडून घेतलेल्या शिकवणुकीला आपल्या गाण्यातून वाव दिला. म्हणूनच अल्लादिया खाँसाहेबांकडून आलेले तालाचे खंड धोंडुताईंनी आत्मसात केले होते.
माझ्यालेखी आदर्श घालून देणारं असं ते व्यक्तिमत्त्व होतं. कोणत्याही ग्लॅमरला न भुलता, पुरस्कार-सत्कार सोहळे यांच्या मागे न लागता, या सर्वांपलीकडे पोचून त्यांनी गानसाधना केली. आपल्या घराण्याचं गाणं पुढे नेणाऱ्या प्रत्येक कलाकाराला त्या ज्ञान देत गेल्या. त्यांच्या जाण्याने अस्तित्वात असलेली विद्या गेली आहे. या समर्पित योगिनीला माझे शतशः प्रणाम. - श्रुती सडोलीकर-काटकर
कणखर धोंडूताई कुलकर्णी या कणखर व्यक्तिमत्वाच्या गायिका होत्या. केशरबाई केरकर, उस्ताद भुर्जी खाँ, लक्ष्मीबाई जाधव यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय शिक्षणाचे धडे घेतले. अखेरपर्यंत त्यांनी परंपरागत गायिकीची कास सोडली नाही. निधनाच्या आधी दोन महिन्यांपर्यंत त्या शिकवत होत्या. त्यांचे गाणे विद्वत्तापूर्ण आणि शुद्ध आकाराचे होते. जयपूर घराण्याची खासियत त्यांनी नव्या पिढीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली. त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता. - मुकुंद मराठे, गायक
शिस्तबद्ध गाणे धोंडूताई जयपूर घराण्याच्या मोठ्या गायिका होत्या. जयपूरला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचा सहवास मिळाला. त्यांचे गाणे जवळून ऐकता आले. अत्यंत शुद्ध आणि शिस्तबद्ध गायकी होती त्यांची. त्यांच्या गायिकीच्या तुलनेत त्यांना प्रसिद्धी मिळाली नाही. परंतु जयपूर घराण्याचा वारसा त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोहोचवला. त्यांचे जाणे धक्कादायक आहे. - उल्हास बापट, गायक
No comments:
Post a Comment