Tuesday, July 21, 2009

ज्येष्ठ गायिका गंगूबाई हनगल यांचे निधन


हुबळी - हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायिका गंगूबाई हनगल यांचे मंगळवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या ९७ वर्षांच्या होत्या. कर्नाटकातील हुबळीमधील खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेथेच मंगळवारी सकाळी ७.१० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

गंगूबाईंच्या मागे दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. श्वसनाचा त्रास होत असल्याने गेल्या तीन जूनपासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी रात्रीपासून त्यांची स्थिती चिंताजनक बनली होती.

गंगूबाई हनगल यांचा जन्म पाच मार्च १९१३ मध्ये धारवाड येथे झाला. शालेय शिक्षण परिस्थितीवशात फारसे झाले नाही. मात्र, हिंदुस्तानी संगीताची ओढ असल्याने किराणा घराण्याचे गायक व गुरू सवाई गंधर्व उर्फ रामभाऊ कुंदगोळकर यांचे शिष्यत्व स्वीकारून त्यांनी स्वरनिष्ठ गायकीची आयुष्यभर जोपासना केली. १९२४ मध्ये बेळगावच्या कॉंग्रेस अधिवेशनात महात्मा गांधी यांच्याकडून गंगूबाईंना गाण्यासाठी शाबासकी मिळाली होती. हुबळीत किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल करीम खॉं यांनीही गंगूबाई या बालगायिकेचे गाणे ऐकून कौतुक केले होते.
कथक नृत्याचे धडे गंगूबाईंनी धारवाडला प्रतापलाल आमि श्‍यामलाल यांच्याकडे गिरवले. कृष्णाचार्य हुलगूर यांच्याकडून त्यांना किराणा घराण्याच्या सत्तर द्रुत चिजा मिळाल्या होत्या. १९३२ च्या सुमारास मुंबईतील मैफलीत ज्येष्ठ गायिका मेनका शिरोडकर, जद्दनबाई (अभिनेत्री नर्गिसच्या आई), पार्श्‍वगायक के. एल. सैगल यांच्यासारख्या दिग्गजांनी गंगूबाईंचे गाणे ऐकून आनंद व्यक्त केला होता. याच साली एचएमव्हीने त्यांच्या गांधारी हनगल या नावाने बारा गाण्यांची ध्वनिमुद्रिका काढली. बाबूराव पेंढारकर यांच्या "विजयाची लग्ने' या चित्रपटातही त्या गायिल्या होत्या. १९३६ पासून त्यांचे सवाई गंधर्व यांच्याकडे रीतसर शिक्षण सुरू झाले आणि त्यानंतर ख्यालगायिका हीच त्यांची ओळख बनली. दरम्यान गुरुराव कौलगी यांच्यासह त्यांचे सांसारीक जीवनही सुरू होते. गृहिणीपद, मातृत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळून त्या रियाज करीत असत.टॉन्सिल्सच्या त्रासावर उपचार घेत असताना १९५० मध्ये त्यांचा मूळचा बारीक आवाज बदलला आणि भरदार, दमदार बनला. हा बदल त्यांनी धीरोदात्तपणे स्वीकारला आणि संगीतसाधना सुरू ठेवली. अल्पावधीतच मान्यवर गायिका म्हणून त्या सर्वज्ञात झाल्या. विविध क्षेत्रातील महान व्यक्तींनी त्यांच्याविषयी गौरवोद्गार काढले आहेत. महाकवी द. रा. बेंद्रे यांनी त्यांना "गायनगंगादेवी' ही पदवी दिली. ज्ञानपीठप्राप्त लेखक एस. एल. भैरप्पाही त्यांचे चाहते होते. त्यांचा पहिला विदेश दौरा १९७९ मध्ये झाला.
द सॉंग ऑफ माय लाइफ हे गंगुबाईंचे आत्मकथन. मूळ कन्नडमधील या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद जी. एन. हनगल यांनी केला आहे.
बंधू शेषगिरी हनगल, कन्या कृष्णा हनगल यांच्या साथीने त्यांनी देशविदेशात अनेक मैफली गाजविल्या.
गंगूबाईंना मिळालेले पुरस्कार
पद्मविभूषण - १९९९
पद्मभूषण - १९७१
संगीत नाटक ऍकॅडमी - १९७३
तानसेन सन्मान - १९८४
माणिकरत्न पुरस्कार - १९९८
पं. रामनारायण पुरस्कार - २००२
वरदराजा आद्या पुरस्कार - १९९७
सप्तगिरी संगीत विद्वानमणी - १९९३
बेगम अख्तर पुरस्कार - १९७४
आयटीसी - १९८२
म्हैसूर संगीत नाटक अकादमी - १९६२
बनारस हिंदी नागरी प्रचार सभा - १९४८
कर्नाटक कला अकादमीचे अध्यक्षपद - १९८१ ते ८४
स्वरशिरोमणी प्रयाग संगीत समिती -१९६९
कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार - १९७०
अनेक विद्यापीठांची डॉक्‍टरेट

No comments: