Monday, February 23, 2009

Report on 3rd day of Abhisheki Sammelan

Report form Sakal

हस्तमुद्रा आणि अभिनयाचा मिलाफ असलेले नृत्य आणि बहारदार गायनाने रसिक रविवारी मंत्रमुग्ध झाले. "स्वरप्रतिभा' या पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या सांगीतिक कारकिर्दीचा वेध घेणाऱ्या कार्यक्रमाने "पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सवा'चा समारोप झाला.

तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान, आपला परिसर ट्रस्ट आणि नगरसेवक उज्ज्वल केसकर यांच्यातर्फे आयोजित "पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सवा'त पंडिता शुभदा यांचे ओडिसी नृत्य आणि पं. जसराज यांचे शिष्य रतन मोहन शर्मा यांचे गायन झाले. "सकाळ' या महोत्सवाचा माध्यम प्रायोजक होता.

आदि शंकराचार्यविरचित "शिवपंचाक्षर स्तुती'ने शुभदा यांच्या कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर गुरू केलुचरण महापात्ररचित "सावेरी' रागातील "पल्लवी' ही रचना त्यांनी सादर केली. कळी उमलून फूल होण्याची प्रक्रिया त्यांच्या नृत्यातून साकारली. "जटायू मोक्ष' या तुलसी रामायणावर आधारित रचनेतून त्यांनी हस्तमुद्रा आणि अभिनयाद्वारे कथा उलगडली. त्यांना विजय तांबे यांनी बासरीची, कौशिक बसू यांनी पखवाजची, अलका गुर्जर यांनी सतारची, अग्निमित्र बेहरे यांनी व्हायोलिनची; तर एस. ऋषी यांनी गायनाची साथ केली. या वेळी विद्याताई अभिषेकी यांच्या हस्ते ज्येष्ठ तबलावादक चंद्रकांत कामत यांचा अमृतमहोत्सवानिमित्त आणि नाट्य संमेलनाध्यक्ष रामदास कामत यांचा सत्कार करण्यात आला.

मेवाती घराण्याचे युवा गायक रतन मोहन शर्मा यांनी "पूरिया' आणि "मेघ' हे राग सादर केले. त्यांना उदय कुलकर्णी यांनी हार्मोनिअमची, अजिंक्‍य जोशी यांनी तबल्याची, गोविंद भिलारे यांनी पखवाजची साथ केली; तर सुरेश पत्की यांनी स्वरसाथ केली. "अबीर गुलाल उधळीत रंग' हा पं. अभिषेकी यांनी लोकप्रिय केलेला अभंग त्यांनी गायिला तेव्हा रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.



"स्वरानंद'निर्मित "स्वरप्रतिभा' या दृक्‌श्राव्य कार्यक्रमातून पं. अभिषेकी यांची सांगीतिक कारकीर्द उलगडली. कामत यांच्यासह सुमेधा देसाई, अभिषेकी यांचे पुत्र शौनक अभिषेकी आणि शिष्य हेमंत पेंडसे यांनी सोळा रागांचा समावेश असलेली "रागमाला', "कितक दिन', "हरिभजनावीण काळ घालवू नको रे', "गर्द सभोवती', "सुरत पिया', "हे सुरांनो चंद्र व्हा', "माझे जीवनगाणे' ही गीते सादर केली. ज्योत्स्ना भोळे, पं. प्रभाकर कारेकर, वसंत कानेटकर, प्रभाकर पणशीकर, फय्याज, प्रसाद सावकार, मंगेश पाडगावकर या मान्यवरांची अभिषेकी यांची वैशिष्ट्ये सांगणारी मनोगते पडद्यावर दाखविण्यात आली. या कार्यक्रमाचे संहितालेखन शैला मुकुंद यांचे, तर निवेदन वंदना खांडेकर यांचे होते. अभिषेकी यांच्या स्वरातील "सर्वात्मका' या ध्वनिमुद्रित भैरवीने महोत्सवाची सांगता झाली.

No comments: