Report form Sakal
हस्तमुद्रा आणि अभिनयाचा मिलाफ असलेले नृत्य आणि बहारदार गायनाने रसिक रविवारी मंत्रमुग्ध झाले. "स्वरप्रतिभा' या पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या सांगीतिक कारकिर्दीचा वेध घेणाऱ्या कार्यक्रमाने "पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सवा'चा समारोप झाला.
तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान, आपला परिसर ट्रस्ट आणि नगरसेवक उज्ज्वल केसकर यांच्यातर्फे आयोजित "पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सवा'त पंडिता शुभदा यांचे ओडिसी नृत्य आणि पं. जसराज यांचे शिष्य रतन मोहन शर्मा यांचे गायन झाले. "सकाळ' या महोत्सवाचा माध्यम प्रायोजक होता.
आदि शंकराचार्यविरचित "शिवपंचाक्षर स्तुती'ने शुभदा यांच्या कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर गुरू केलुचरण महापात्ररचित "सावेरी' रागातील "पल्लवी' ही रचना त्यांनी सादर केली. कळी उमलून फूल होण्याची प्रक्रिया त्यांच्या नृत्यातून साकारली. "जटायू मोक्ष' या तुलसी रामायणावर आधारित रचनेतून त्यांनी हस्तमुद्रा आणि अभिनयाद्वारे कथा उलगडली. त्यांना विजय तांबे यांनी बासरीची, कौशिक बसू यांनी पखवाजची, अलका गुर्जर यांनी सतारची, अग्निमित्र बेहरे यांनी व्हायोलिनची; तर एस. ऋषी यांनी गायनाची साथ केली. या वेळी विद्याताई अभिषेकी यांच्या हस्ते ज्येष्ठ तबलावादक चंद्रकांत कामत यांचा अमृतमहोत्सवानिमित्त आणि नाट्य संमेलनाध्यक्ष रामदास कामत यांचा सत्कार करण्यात आला.
मेवाती घराण्याचे युवा गायक रतन मोहन शर्मा यांनी "पूरिया' आणि "मेघ' हे राग सादर केले. त्यांना उदय कुलकर्णी यांनी हार्मोनिअमची, अजिंक्य जोशी यांनी तबल्याची, गोविंद भिलारे यांनी पखवाजची साथ केली; तर सुरेश पत्की यांनी स्वरसाथ केली. "अबीर गुलाल उधळीत रंग' हा पं. अभिषेकी यांनी लोकप्रिय केलेला अभंग त्यांनी गायिला तेव्हा रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
"स्वरानंद'निर्मित "स्वरप्रतिभा' या दृक्श्राव्य कार्यक्रमातून पं. अभिषेकी यांची सांगीतिक कारकीर्द उलगडली. कामत यांच्यासह सुमेधा देसाई, अभिषेकी यांचे पुत्र शौनक अभिषेकी आणि शिष्य हेमंत पेंडसे यांनी सोळा रागांचा समावेश असलेली "रागमाला', "कितक दिन', "हरिभजनावीण काळ घालवू नको रे', "गर्द सभोवती', "सुरत पिया', "हे सुरांनो चंद्र व्हा', "माझे जीवनगाणे' ही गीते सादर केली. ज्योत्स्ना भोळे, पं. प्रभाकर कारेकर, वसंत कानेटकर, प्रभाकर पणशीकर, फय्याज, प्रसाद सावकार, मंगेश पाडगावकर या मान्यवरांची अभिषेकी यांची वैशिष्ट्ये सांगणारी मनोगते पडद्यावर दाखविण्यात आली. या कार्यक्रमाचे संहितालेखन शैला मुकुंद यांचे, तर निवेदन वंदना खांडेकर यांचे होते. अभिषेकी यांच्या स्वरातील "सर्वात्मका' या ध्वनिमुद्रित भैरवीने महोत्सवाची सांगता झाली.
गायन, वादन आणि नृत्याचा अनोखा मिलाफ असलेल्या "स्वर तालयात्रा' या कलाविष्काराने रसिक शुक्रवारी मंत्रमुग्ध झाले. सहवादन आणि जुगलबंदीच्या माध्यमातून स्वर, ताल, लय आणि नादाची अनुभूती देणाऱ्या कार्यक्रमाने "पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सवा'स सुरवात झाली.
तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान, आपला परिसर ट्रस्ट आणि नगरसेवक उज्ज्वल केसकर यांच्यातर्फे आयोजित "पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सवा'चे उद्घाटन ज्येष्ठ तबलावादक तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते झाले. विद्याताई अभिषेकी, आमदार गिरीश बापट, नगरसेवक अनिल शिरोळे, भरत वैरागे, गणेश बिडकर, मनीष साळुंके आणि योगेश गोगावले या वेळी उपस्थित होते. 'सकाळ' या महोत्सवाचा माध्यम प्रायोजक आहे.
पं. तळवलकर यांनी या कार्यक्रमामागची संकल्पना सांगितली. ते म्हणाले, "गायन, वादन आणि नृत्य यातून केवळ संगीताचा आविष्कार होतो. पंरपरेमध्ये नवतेची मूल्ये सामावली आहेत आणि नवतेला परंपरेचा साज असतो.'' या कार्यक्रमात त्यांच्यासह सत्यजित तळवलकर, चारुदत्त फडके (तबला), ओंकार दळवी (पखवाज), श्रीधर पार्थसारथी (मृदंग), तन्मय देवचक्के (हार्मोनिअम), रवी चारी (सतार), अनय गाडगीळ (सिंथेसायझर), संदीप कुलकर्णी (बासरी) यांचा सहभाग होता. शौनक अभिषेकी आणि रघुनंदन पणशीकर यांच्या गायन साथीने कार्यक्रमात रंग भरला. शांभवी वझे, परिमल फडके, कावेरी आगाशे, मुक्ती श्री आणि शीतल कोलवालकर यांनी नृत्याचे सादरीकरण केले. इशान कौशल, सावनी तळवलकर आणि मयंक बेडेकर यांनी पढंत गायनाची साथ केली.
'महादेव शंकर' या शिववंदना बंदिशीने कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर राग 'सोहनी'ची "चलो हटो पियॉं' ही आडा चौतालाची रचना सादर करण्यात आली. स्वर, ताल आणि भरतनाट्यम-कथक नृत्य यांच्या जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध झाले. राधा-कृष्ण स्तुतीपर रचना आणि "ललत' रागातील तराणा सादर झाला. उत्तरार्धात तळवलकर यांनी विविध मात्रांचे लालित्यपूर्ण सादरीकरण केले. ज्येष्ठ नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.