पंधरावा पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सव पुण्यात १५ ते १७ 
नोव्हेंबर २०१९ या कालावधीत रंगणार आहे. उज्ज्वल केसकर, आपला परिसर व 
तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले 
आहे. युवा कलाकारांचे कार्यक्रमही या महोत्सवात होणार असून, कोथरूडच्या 
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा महोत्सव होणार आहे.
पं.
 जितेंद्र अभिषेकी हे संपूर्ण संगीत क्षेत्रात आदराने घेतले जाणारे नाव. 
शास्त्रीय संगीतामध्ये व्यासंगी, चतुरस्र गायक म्हणून त्यांची स्वतःची 
वेगळी ओळख होती. ख्याल गायनावर मनापासून प्रेम करणारे पंडितजी सुगम 
प्रकारापासून, नाट्यसंगीत, टप्पा, ठुमरी, कजरी, दादरा, होरी, भजन या सर्व 
प्रकारांत केवळ अभ्यासकाच्या भूमिकेत राहिले नाहीत, तर या प्रकारांतील 
सादरीकरणामध्ये त्यांनी केलेली पेशकश व कामगिरी फार उच्च दर्जाची होती. 
त्यांच्या मैफली चतुरस्र असत आणि त्यात संगीताचे हे सर्व प्रकार ऐकायला 
मिळत असत. रसिक त्यामध्ये अक्षरशः न्हाऊन निघत. अशा चतुरस्र गायकाच्या 
स्मृतीनिमित्त या महोत्सवाचे आयोजन केले जाते. 
यंदाच्या
 महोत्सवाचे उद्घाटन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार असून, 
पुण्याच्या महापौर आणि नवनिर्वाचित आमदार मुक्ता टिळक या प्रसंगी प्रमुख 
पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. 
१५, १६ 
आणि १७ नोव्हेंबर २०१९ म्हणजे शुक्रवार ते रविवार या तीन दिवसांत, पाच 
सत्रांत हा महोत्सव होणार असून, युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी 
शनिवार व रविवारी सकाळच्या सत्रात युवोन्मेष कार्यक्रमदेखील आयोजित केले 
आहेत. सर्व कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार असून, विनामूल्य 
आहेत. 
संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या
 एका व्यक्तीला दर वर्षी पं. जितेंद्र अभिषेकी स्मृती पुरस्कार देण्यात 
येतो. हा पुरस्कार या वर्षी शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आयोजित करणारे 
ज्येष्ठ आयोजक महेशबाबू यांना देण्यात येणार आहे. तसेच तरुण कलावंतांना पं.
 जितेंद्र अभिषेकी युवा पुरस्कार दिला जातो. यंदाचा युवा पुरस्कार सुरंजन 
खंडाळकर यांना देण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे
 पुरस्काराचे स्वरूप आहे. 
दैनंदिन कार्यक्रमांचे वेळापत्रक :
शुक्रवार, १५ नोव्हेंबर :
 सायंकाळी साडेपाच वाजता उद्घाटन समारंभानंतर ‘सुगम संगीत रजनी.’ यात 
भाव-भक्तिसंगीताचा समावेश असलेल्या लोकप्रिय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 
सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर, मधुरा दातार, सुप्रसिद्ध गायक किशोर 
कुलकर्णी, चैतन्य कुलकर्णी यांचा यात सहभाग आहे. सुप्रसिद्ध निवेदक मिलिंद 
कुलकर्णी निवेदन करणार आहेत. 
शनिवार, १६ नोव्हेंबर : सकाळी
 नऊ वाजता युवोन्मेष या कार्यक्रमामध्ये विश्वजfत मेस्त्री (गायन), अधिश्री
 पोटे (गायन) व युवा पुरस्कार विजेते कलाकार सुरंजन खंडाळकर (गायन) यांचे 
सादरीकरण होणार आहे. 
शनिवार, १६ नोव्हेंबर :
 सायंकाळी साडेपाच वाजता प्रसिद्ध गायिका अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी या
 भगिनींची गायन जुगलबंदी, तसेच अभिषेक बोरकर आणि शाकीर खान यांची सरोद-सतार
 जुगलबंदी आणि सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक रघुनंदन पणशीकर आणि आनंद भाटे 
यांची गायन जुगलबंदी हे अनोखे कार्यक्रम आहेत. 
रविवार, १७ नोव्हेंबर :
 सकाळी नऊ वाजता युवोन्मेष या कार्यक्रमामध्ये नितीश पुरोहित (सरोद), 
तबलासाथ - आदित्य देशमुख, श्रुती वझे (गायन), संस्कृती -प्रकृती वहाणे 
(संतूर-सतार जुगलबंदी), माजी युवा पुरस्कार विजेत्या कलाकार अपर्णा केळकर 
(गायन) यांचे सादरीकरण होणार आहे. 
रविवार, १७ नोव्हेंबर : सायंकाळी
 साडेपाच वाजता अखेरच्या सत्रात पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य मकरंद 
हिंगणे यांचे शास्त्रीय गायन, तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रसिद्ध 
बासरीवादक पं. रोणू मजुमदार यांचे बासरीवादन होणार आहे. प्रसिद्ध तबलावादक 
पं. रामदास पळसुले त्यांना तबल्यावर साथसंगत करणार आहेत. 
महोत्सवाचा
 समारोप शेखर सेन व सहकाऱ्यांच्या ‘कबीर’ या अनोख्या संगीतमय प्रयोगाने 
होणार आहे. संपूर्ण महोत्सवात दिग्विजय जोशी, मिलिंद कुलकर्णी, रवींद्र खरे
 व रश्मी अभिषेकी हे निवेदन करणार आहेत. या महोत्सवाला कोणतेही प्रवेशमूल्य
 नसून, दर वर्षीप्रमाणेच रसिकांनी यंदाही महोत्सवाला उदंड प्रतिसाद द्यावा,
 असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 
No comments:
Post a Comment